पाथरी प्रतिनिधी / रमेश बिजुले – विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ते उमेदवारीसाठी आग्रही असताना व महाविकास आघाडी कडून विद्यमान आ. सुरेश वरपूडकर किंवा माजी आ. दुर्राणी यांच्या नावाचे अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच दुर्राणी यांनी दबाव तंत्राचा वापर करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याचे बोलले जात आहे. सोबतच दुर्राणी हे मागील काही दिवसापासून मराठा आरक्षण योद्धा मनोज जरोगे पाटील यांच्या आंतरवाली सराटी येथे जाऊन भेटीगाठी घेत असल्याने त्यांचे समर्थन घेत अपक्ष उमेदवारी दाखल केली असावी असाही एक तर्क राजकीय अभ्यासकांकडून लावल्या जात आहे.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी माजी आ. दुर्राणी यांनी दुपारी २ वा. आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या कडे दाखल केला. यावेळी सुभाष कोल्हे, माजी नगराध्यक्ष तबरेज खान दुर्राणी, दत्तराव मायंदळे, संदीप टेंगसे विष्णू काळे आनंद धनले यांच्यासह काही मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान पाथरी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी १८ व्यक्तींनी ५२ उमेदवारी अर्जाची खरेदी केली. यातील एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.


