परभणी / प्रतिनिधी – विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी बुधवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी करण्यात आली. या छानणीत परभणी मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सय्यद समी उर्फ माजू लाला यांचा अर्ज अवैध ठरला आहे.
परभणी विधानसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 46 उमेदवारांंनी 59 अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) चे विद्यमान आ. डॉ. राहूल पाटील, शिवसेना शिंदे गटाचे आनंद भरोसे आणि वंचित बहुजन आघाडीचे सय्यद समी उर्फ माजू लाला यांच्यामध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता होती. मात्र छाननीमध्ये माजू लाला यांच्या नामनिर्देशन अर्जातील तांत्रिक चुकीमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आल्याचे निवडणूक अधिकार्यांनी स्पष्ट केले.ं त्यामुळे या निवडणूकीत वंचित बहूजन आघाडीचे आव्हान संपुष्टात आले असून आता दोन शिवसेनेत सरळ लढत होवून दुरंगी लढतीची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे होणारे मतांचे विभाजन कोणाचे पारड्यात पडते व याचा कोणाला फायदा होतो हे आताच सांगणे कठीण आहे.


