पाथरी प्रतिनिधी / रमेश बिजुले – सोनपेठ येथे इंग्लिश स्कूल मध्ये शिकणाऱ्या कहार समाजाच्या चार वर्षीय बालिकेवर शाळेतील शिक्षकांने अत्याचार केल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी घडली आहे. वरील घटनेच्या निषेधार्थ आज सोमवारी सकाळी ११:३० वाजता पैठण येथे कहार समाजाच्या वतीने प्रचंड आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास कहार गल्ली येथील दक्षिण मुखी मारुती मंदिर येथून सुरुवात झाली. हा मोर्चा गागाभट्ट चौक, शिवाजी चौक, बस स्थानक चौक मार्गाने तहसील कार्यालयावर धडकला.
आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. अशा घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता . मोर्चात संभाजीनगर, अहमदनगर बीड, जालना जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने महिला व पुरुष आपल्या व्यवसाय बंद ठेऊन सहभागी झाले होते. या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


